
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
धारूर :- येथील अरुंद अवघड घाटाने आज पुन्हा एक बळी घेतला. उस्मानाबाद कडून माजलगावकडे सिमेंट घेऊन निघालेला ट्रक (एमएच २५ पी ९५४७) घाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. या अपघातात ट्रकमध्ये चिरडून चालक मुस्तफा उमपुरे (वय ३२, रा. उमरगा) हा गंभीर जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेतील मुस्तफाला धारूर येथील शासकीय रुग्णालयाच्या 108 रुग्णवाहिकेचे डॉ.अरविंद निकते आणि पायलट अमर मुंडे यांनी तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले , परंतु वाटेतच मुस्तफाचा मृत्यू झाला. दरम्यान, अरुंद रस्ता आणि अवघड वळणामूळे धारूरचा घाट मृत्यूचा सापळा बनला असून वारंवार होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. घाटाचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत आहे.