
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी
राठोड रमेश
अहमदपूर :- औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने ठाण्यातच रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार व रविवारच्या मध्यरात्री २.१५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली १२ जणांविरुध्द किल्लारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत सावंत हे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून पुढे आलेले आहेत. त्यांना पत्नी आणि तीन लहान मुली आहेत. हे सर्व कुटुंब मूळ गावी वास्तव्यास असल्यामुळे घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुली किल्लारी पोलीस ठाण्यात आईसमवेत दाखल झाल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातील समुद्रवाणी येथील मूळचे रहिवासी असलेले साहेब ऊर्फ साहेबराव सीताराम सावंत (वय ३८) हे किल्लारी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत होते. सावंत यांना पत्नी आणि तीन लहान मुली असून, हे कुटुंब त्यांच्या मूळ गावीच वास्तव्यास असते. साधारण चार वर्षांपूर्वी २०१७ मध्ये सावंत यांनी स्वतःच्या घरावर कर्ज काढून ९ लाख ५० हजार रुपये हलसी येथील रहिवासी असलेल्या धनराज सूर्यवंशी याला उसने दिले होते. मागील अनेक दिवसांपासून सावंत उसने दिलेले पैसे परत मागत होते; परंतु पैशांची मागणी केली की धनराज सूर्यवंशी हा ‘तू नोकरी कशी करतोस तेच बघतो’ असे म्हणत दम देत होता.
अनेकदा त्याने सावंत यांना मारहाणही केली होती. इतकेच नाही, तर आरोपी सूर्यवंशी याने अन्य काही लोकांना मध्ये घालून सावंत यांना धमक्या देण्यास सुरुवात केली होती. सावंत हे शनिवारी रात्री ड्यूटीवर असताना या सर्वांच्या त्रासाला कंटाळून मध्यरात्री २.१५ वाजेच्या सुमारास ठाण्यातील सीसीटीएनएस रुममध्ये गेले आणि तेथील खुर्चीत बसले. त्यानंतर ठाण्यातील बंदुक हनुवटीच्या खाली लावली आणि स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. बंदुकीचा आवाज ऐकून ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. आत्महत्येपूर्वी मयत सावंत यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहिली असून, यात त्यांनी त्रास देणाऱ्या १२ लोकांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देत सर्व माहिती घेतली. त्यानंतर सुदाम सीताराम सावंत (वय ६५, रा. शिवाजीनगर, सांजा रोड, उस्मानाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून किल्लारी पोलिसांत गुरनं ६२ / २२ कलम ३०६, ४२०, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये आरोपी धनराज सूर्यवंशी, सलीम सय्यद, पोलीस हवालदार बेग, पोलीस नाईक काळे, पोलीस नाईक मामडगे, चंदू पाटील, चंदू बरमदे, सोनू पाटील, राजू सूर्यवंशी, ईश्वर पाटील निलंगा, सलीम सय्यद, हेडमास्तर गायकवाड आणि धनराज सूर्यवंशी याचा भाऊ, पत्नी, मेहुणा आणि बहीण यांच्याविरुध्द ती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक द्द निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवार, किल्लारी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, रंजीत काथवटे, ठाणे अमलदार गणेश यादव, सचिन उस्तुर्गे, गौतम भोळे, आबासाहेब यांच्यासह तालुक्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी साइंगळे त्री सुसाईड नोटमधील काही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून, इतरांबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच उर्वरित व्यक्तींना ताब्यात घेऊ, असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सांगितले.