
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन, कुटुंबियांना तातडीने मदत देण्याचे निर्देश
पुणे दि.14 :- कदमवाक वस्ती येथे ड्रेनेज लाइनचे काम करत असताना २ मार्च रोजी चार कामगारांच्या गुदमरून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी आढावा घेतला. त्यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांशीही चर्चा करून सांत्वन केले. कुटुंबीयांना तात्काळ मदत देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संजय आसवले, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, डॉ.सुधाकर पानीकर, समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर, सरपंच श्रीमती गौरी गायकवाड, दक्षता समितीचे सदस्य ॲड. सागर चरण, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, ग्रामसेवक अमोल घोळवे आदी उपस्थित होते.
श्री.वावा म्हणाले, कदमवाक वस्ती येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला तातडीने मदत झाली पाहीजे. त्यांना आर्थिक मदतीसोबतच पक्के घर, रोजगार याबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायत कर्मचारी संख्या, कर्मचारी विमा योजना, एकूण कार्यरत सफाई कर्मचारी,तात्पुरते कर्मचारी,त्यांचे वेतन आदींचाही त्यांनी आढावा घेतला.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कुटुंबियांना मदत करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी माहिती दिली.
यावेळी पोलीस, ग्रामपंचायत तसेच महसूल यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.