
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या पाचही राज्यात काँग्रेसला प्रचंड पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबमध्ये तर असलेली सत्ताही काँग्रेसला गमवावी लागली आहे. गोव्यात मागच्यावेळी काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. मात्र, यावेळी काँग्रेसला गोव्यातही फारसा करिश्मा दाखवता आलेला नाहीये. त्यामुळे काँग्रेस खडबडून जागी झाली आहे. काल रविवारी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली.
या बैठकीला काँग्रेसचे एकूण 52 नेते उपस्थित होते. तब्बल पाच तास ही बैठक चालली. यावेळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातच पक्ष पुढे नेण्याचं ठरलं. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या पराभवाच्या नेमक्या कारणावर बोट ठेवलं. आपण अजूनही जुन्याच पद्धतीने निवडणूक लढवत आहोत. त्यामुळेच सातत्याने आपल्याला पराभव पत्करावा लागत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.