
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील संगमवाडी येथे मंगळवार दि. 15 मार्च रोजी अखंड हरिनाम सप्ताह विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे.वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे. टाळ आणि मृदूंगाचा निनाद, भगव्या पताकांची दाटी, जय हरिचा नामघोष, अशा मंगलमय वातावरणात संगमवाडी येथे 43 वर्षांपासून चालु आहे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. वारकरी सेवाभुषण पुरस्कार प्राप्त भजन सम्राट ह.भ.प. प्रेमराव (मामा) आनंदवाडीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहास 8 मार्च मंगळवारी सुरुवात झाली होती व 15 मार्च ला समाप्ती झाली.
भागवताचार्य ह.भ.प. दत्ता महाराज सुभाषनगरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधन केले तसेच संगीत विशारद गोपीनाथ केंद्रे याच्या मधुर संगीताने संगमवाडी नगरी दुमदुमली. अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन,भागवत कथा, हरिपाठ, व नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन दररोज करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामस्थ -भाविकांनी आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण केली. सप्ताहाची सांगता दि. 15 मार्च रोजी ह.भ.प. वैराग्य मूर्ती प्रभाकर महाराज झोलकर(नाना) यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. तसेच ग्रामस्थ बंधू भगिनींनी दिंडीत सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा गजर केला. सप्ताह समाप्तीचे धार्मिक विधी पार पडल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
अखंड हरिनाम सप्ताहात आई वडिलांची सेवा करणे, जात-पात, गरीब-श्रीमंत भेद न मानता फक्त आणि फक्त भक्तीभाव जपला जातो आणि हाच भक्तीभाव प्रत्येकाला जगण्यासाठीची नवी उर्जा देत असतो, त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधन होणे ही काळाची गरज आहे असे मत यावेळी अनेक किर्तनकारानी मांडले. अखंड हरिनाम सप्ताह कल्याच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त यांनी उपस्थिती लावली .
कीर्तनाला आजूबाजूच्या गावातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने व सप्ताह कमिटीच्या वतीने आभार मानण्यात आले.