
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल २०२२ दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २१ हजार ३८४ ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला असून लेखी परीक्षेत ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिट तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.
दरम्यान, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून त्याला अनुसरून बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी करोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्यास ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.