
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन सोशल मीडियावरही वाद सुरु आहेत. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सोशल नेटवर्किंगवर सध्या ‘द काश्मिर फाइल्स’वरुन चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांनी या चित्रपटाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त केली आहेत. तर काहींनी या चित्रपटाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केले. दोन्ही बाजूने या चित्रपटाबद्दल बोललं जात आहे. या चित्रपटावरुन मतमतांतरे असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदि ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात बोलताना म्हणाले, सत्य गोष्टी समोर आल्या पाहिजे. तुम्ही सध्या पाहिलं असेल की ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जे लोक नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरतात, ती पूर्ण जमात मागील पाच-सहा दिवसांपासून खवळले आहेत. तथ्य आणि कला म्हणून या चित्रपटाचे विवेचन करण्याऐवजी त्याचं श्रेय हिरावून घेण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आली आहे. तुम्ही पाहिलं असेल, यासाठी एक पूर्ण इकोसिस्टीम काम करतेय. सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, असं पंतप्रधान या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले.