
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे, दि. 15 :- पिपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे आदी उपस्थित होते. अपर पोलीस आयुक्त डॉ. शिंदे म्हणाले, सिम्युलेटर कक्षामध्ये उपलब्ध असलेल्या विविध परिस्थितीतील रस्ते व त्या अनुषंगाने तेथील वाहतूक नियम याचे उत्तम मॉड्युल उपलब्ध आहेत. वाहन चालकांना प्रत्यक्ष रस्त्यावर सुरक्षितरित्या वाहन चालविण्यासाठी मदत होणार आहे. परिक्षेत्रातील सर्व वाहन चालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
रस्ते वाहतुकीची समस्या लक्षात घेता रस्ता सुरक्षा आणि सुरक्षित चालक विकसीत करण्याच्या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य तर्फे रस्ता सुरक्षा निधीतून दोन सिम्युलेटर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. सिम्युलेटर वर्टेक्स रिसर्च सेंटर, तामिळनाडू यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेले आहे. दोन्ही सिम्युलेटर कार्यालयात येणाऱ्या सर्व उमेदवारासाठी आभासी प्रशिक्षणासाठी खुले ठेवण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. आदे यांनी दिली आहे.