
दैनिक चालु वार्ता
मुखेड तालुका प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मागील १३५ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे हजारो कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एसटीची चाके थांबली होती. मात्र आंदोलन दिवसेंदिवस भरकटत असल्याने शासनाच्या आव्हानांना प्रतिसाद देत मुखेड आगारात ३५ कर्मचारी रुजू झाल्याने आगारातून दररोज ३४ फेऱ्या होत आहेत. यामुळे मुखेड आगाराला आर्थिक उत्पन्न सुरू झाले आहे. मुखेड आगार हे उत्पन्नाच्या तुलनेत राज्यातील काही आघाडीच्या आगारांमध्ये गणले जाते.
मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी मागील १३५ दिवसांपासून संप पुकारला आहे. यात राज्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे एसटीची चाके जागच्या जागी थांबली आहेत. राज्य शासनाकडून कुठलाही निर्णय होत नाही व न्यायालयाकडून तारीख वाढून भेटत असल्यामुळे हा संप लांबत चालला आहे. मात्र आता संपाला कंटाळलेले काही कर्मचारी शासनाच्या आव्हानांना प्रतिसाद देत पुन्हा सेवेत रुजू होत आहेत.
असेच ३५ कर्मचारी मुखेड आगारात रुजू झाले असून यात चालक, वाहक व यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. मुखेड आगारात दररोज सरासरी पाच लाखांचे उत्पन्न होते मात्र कर्मचारी संप असल्यामुळे मुखेड आगाराचे आर्थिक उत्पन्न बंद झाले होते. कर्मचारी कामावर रुजू झाल्यामुळे नांदेड साठी जाणे-येणे असे एकूण बारा फेऱ्या मुक्रमाबाद साठी दहा, शिरूर ताजबंद साठी आठ व कंधार साठी चार फेऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या मध्ये शिखर शिंगणापूर व सोलापूर या गाड्या सुरू झाले आहेत.
यामुळे ता. ११ मार्च रोजी मुखेड बस आगाराला तब्बल ८६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगारप्रमुख एस. टी. शिंदे यांनी दिली. दरम्यान परिवहन मंत्र्यांच्या दिलासादायक घोषणेची व न्यायालयाच्या निकालाची वाट पाहात असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. तर कर्मचाऱ्यांनी जनतेची होत असलेली हेळसांड पाहता संपाचा आग्रह सोडून कामांवर परतावे असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.