
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- मनरेगा निधीमधून करावयाची कुशल कामे अधिक गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे.त्यासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांनी आवश्यक ज्ञान आत्मसात करून स्वत:ला अद्ययावत ठेवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. मनरेगातील कुशल कामांत गुणवत्तापूर्ण बांधकाम पद्धती अवलंबण्यासाठी पॅनल तांत्रिक अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात झाली,त्याचे उद्घाटन करताना श्री.पंडा बोलत होते.राज्य गुणवत्ता नियंत्रक तथा अधिक्षक अभियंता (मंत्रालय) राजेंद्र शहाडे,राम मेघे महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक मयूर बनारसे,गुणवत्ता सल्लागार संदीप जोशी,रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे आदी यावेळी उपस्थित होते.
पी.टी.मासे अँड असोसिएटसच्या तज्ज्ञांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जिल्ह्यातील ९५ तांत्रिक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मनरेगातून जिल्ह्यात अनेक कुशल कामे राबविण्यात येत आहेत.अपर मुख्य सचिव (रोहयो) नंदकुमार यांच्या संकल्पनेतून कुशल कामांवरील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांनी तज्ञानकडून माहिती आत्मसात करून कामाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश श्री.पंडा यांनी दिले. जिल्ह्यात मनरेगा निधीमधून पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक कुशल कामांना चालना देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ७५ कोटी रूपये निधीतून रस्त्यांचे काँक्रिटीकरण,४९ कोटी रूपये निधीतून मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात डांबरी रस्ते,त्याचप्रमाणे ५९ अंगणवाड्यांचे बांधकाम,शाळा कुंपण भिंती अशा अनेक कामांचे नियोजन आहे.ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत.बांधकामांच्या अद्ययावत पद्धतींचा अवलंब व्हावा यासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजिण्यात आली असे उपजिल्हाधिकारी श्री.लंके यांनी सांगितले. श्री. बनारसे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.क्षमता बांधणीसाठी याप्रकारच्या कार्यशाळा सातत्याने व्हाव्यात,अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली.