
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- राज्याचे राजकीय वातावरण गढूळ झाले असताना आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर येत्या सोमवारी दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रश्मी शुक्ला पुणे कमिशनर असताना माझा नंबर टॅपिंग केला. माझी बदनामी करण्याचे काम केलं. याप्रकरणात माझी व्यक्तिगत बदनामी झाली असल्यानं रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी खडसावून सांगितले आहे.
यावेळी ते म्हणाले, डीजी आणि नागपूर सीपी, रश्मी शुक्लांसह फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. यावेळी राज्यपालांवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, राज्यपाल कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. राज्यपालांचा आम्ही अपमान करत नाही पण त्या पदावर बसलेली व्यक्ती चुकीची आहे. काँग्रेस यापुढे “राज्यपाल गोबॅक” आंदोलन करायलाही मागेपुढे पाहणार नाही असा इशाराही पटोले यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, येणाऱ्या काळात कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार असून सूत्रधारांचा पर्दाफाश मविआ केल्याशिवाय राहणार नाही. केंद्र सरकार परराष्ट्रीय धोरणात अपयशी ठरले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युक्रेन मधून भारतीयांना सोडून आणण्यात आपले सामर्थ्य आहे हे सांगून पाठ थोपटून घेणे कितपत योग्य आहे असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.