
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- शिवसेना विरुद्ध राणे वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. दिशा सालियनच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या वक्तव्यांसंदर्भात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत भर पडली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. 24 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा इशारा राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना दिला आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांनी राहुल कनाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर नितेश राणे यांनी काही ट्वीट केले होते. राहुल कनाल यांच्या 8 आणि 13 जून 2020 रोजीच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि सीडीआर तपासल्यास दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होऊ शकते. राहुल कनाल हे यासंबंधित गुन्ह्यातील जोडीदार असाही आरोप राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूवरुन राहुल कनाल यांच्यावर आरोप करणारे अनेक ट्वीट केले होते.