
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
किव्ह :- ब्रेड घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या १० जणांचा रशियन लष्कराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना युक्रेनच्या चर्नीहिव्हमध्ये आज बुधवारी (ता.१६) घडली आहे. या घटनेविषयी माहिती किव्हमधील अमेरिकेच्या दुतावासाने दिली आहे. इतके भयानक हल्ले थांबवलेच पाहिजे. आम्ही उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करुन युक्रेनमधील गुन्ह्यांसाठी जबाबदारी निश्चित करत आहोत, असे दूतावासाने सांगितले. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या संसदेकडे युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी आणखीन मदत करावी अशी विनंती केली आहे.
आम्हाला आताच्या घडीला तुमची गरज आहे. मी तुम्हाला आणखीन मदत करण्याचे आवाहन करतो, असे झेलेन्स्की म्हणाले. आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन रशिया व युक्रेनमधील शांतता वार्ताविषयी माहिती दिली आहे. रशियाशी वार्ता करणे अवघड आहे. पण युक्रेनच्या हितेसाठी ती चालूच ठेवणार आहे, असे ते म्हणाले.
अमेरिकेने भारताला रशिया-युक्रेन युद्धाबाबत भूमिका घेत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र भारताच्या या भूमिकेची इतिहासात नोंद होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.