
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
होळी आनंदाचा सण. रंग उडवायचा सण. रंगीला होऊन आनंद घ्यायचा सण. लहान मोठे सर्वंच वेगवेगळ्या रंगात रममान होतात. रंगीत जीवनातील रंगेल माणस त्या दिवशी मजा लुटतात. जणूकाही पाण्यातून रंग, रंगातून फुल व फुलातून जीवन फुलवत जातात. होळी आली रे म्हणून सर्वजण बेभान, बेफाम होवून नाचतात. बुरा मत मानो होली है म्हणून वय विसरून सर्वजण यात सहभागी होतात. पण होळीला बोंबलतात का? काय कारण असेल? तसं तर बोंबलणे अशुभ मानले जाते. आजही खेडेगावातील माणसं कामासाठी निघाली की म्हणतात, ‘अगं बघ त्या कार्टयाकडं तोंडावर हात ठेवेल.’ बोंबलण्याची ही क्रिया समाजात कशी रुढ झाली असेल?
फारफार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नदीच्या काठी एक गाव वसलेलं होतं. त्याचे नाव हिरानगर होते. त्यावेळचा समाज आजच्या सारखा सुधारलेला नव्हता. अंधश्रद्धाळू होता. तेवढाच रितीरिवाज पाळणारा होता. एकाने केलेली कृती जशास तशी दुसरा करायाचा. एक रडायला लागला की दुसरा ही रडण्यास सुरवात करायचा. काय झालं म्हणून ही विचारत नसत. गावातील एकाची कृती, नक्कल म्हणजे सर्वाची कृती, नक्कल समजली जायची. त्या गावात एक चिमना नावाचा माणुस होता. साधा भोळा होता.
फाल्गुण महीना होता. उन्ह बरचं तापलेलं होतं.जंगलातील जनावरं पाणी पिण्यासाठी नदीवर येत होती. गावातील चिमना हा मध्यम वयाचा मानुस नदीवर गेला होता. नदीचं खळखळ वहाणारं पाणी पाहून तो आनंदी होत होता. पूर्वी नद्या बारामाही वाहात राहायच्या. तो वाहात्या पाण्यात कधी हात बुडून पाणी उडवत होता तर कधी पायाने पाणी उडवत इकडेतिकडे पहात होता. एवढयात तेथे पाणी पिण्यासाठी हरणाचा कळप आला. त्यात वयस्क, तरुण व काही पंधारा विस दिवसापूर्वी जन्मलेली पिल्ले (पाडसं) होती. ती सर्व आनंदाने उड्या मारत होती. या दगडावरून त्या दगडावार टूनटून उड्या मारत होती. बेफीकर जीवन जगत होती. जीवनातील दुःखाचं त्यांना काहीच देणंघेणं नव्हत.
त्याचं खेळणं पाहून त्या मध्यमवयीन चिमना या माणसाला स्वतःचं बालपण आठवले. त्याच्या बालपणीच्या सर्व लिला त्याला आठवल्या. ते आठवत आठवत त्याने थोड्या दुरवर नजर फिरवली. नदीच्या दुसऱ्या तटावर एक भला मोठा वटवृक्ष उभा होता. त्याच्या वयाला दोन-तीन शतक तरी उलटले असतील. त्याच्या पारंब्या म्हणजे प्राचीन ऋषींमुनीच्या जटासारख्या दिसत होत्या. म्हातरपणाच्या वेदना, कळा तो शोषित असावा असा भास होत होतं. त्या मानसाने त्या झाडाकडे पाहिले. व त्याला म्हातारपणाची चाहूल लागली. म्हातारपणात काय हालअपेष्टा सोसावे लागतील या विचारात तो गढून गेला.
थोड्या वेळाने त्याची नजर दुसरीकडे वळली. निसर्गाला वसंत ऋतूची चाहूल लागली होती. तारुण्यानं सळसळणारी झाडे त्याला दिसली. त्यात कडूलिंबाचं झाड हिरवागार दिसत होतं. जवानीचा मस्तीपणा त्याच्या पानापानात दिसत होतं. वाऱ्याबरोबर ते डौलत होतं, झूलत होतं. ते पाहून या चिमण्याच्या मनात तारुण्य घुसलं. तारुण्यातील मस्ती मौज मजा याला आठवायला लागली. तो आता आलटून पालटून त्या तिन्ही कडे पाहू लागाला. हारणाची पाडसं आनंदाने उड्या मारत होती. वटवृक्ष निश्चिल शांत होतं. वयाने जर जर झालेलं होतं. तर कडू लिंब आनंदाने वाऱ्यावर झोके खात आपलं तारुण्य प्रकट करत होतं.
तेवढ्यात चिण्याला आवाज आला. तो आवाज वेगवेगळ्या दिशेकडून येत होता. प्रथम त्याने हरणाच्या पाडसांकडे पाहिलं त्यातलं एक पाडस त्याला बोलवत होत. सांगत होतं, ‘आरे बालपण घे. लहान हो. बालपणातल सुख कोणाला मिळतं? ये बालक हो व आमच्या बरोबर बागड, उड्या मार. लहानपण देगा देवा उगीच म्हणत नाहीत. चल विचार करू नको सामिल हो आमच्यात. तेवढ्यात वटवृक्ष म्हणत होतं, ‘ये चिमण्या आरे कधीन कधी म्हातारपण येणारच आहे. ये माझ्या सोबत. आपण दोघं मिळून जगू या जीवन. गाठू या शेवटचा टप्पा. ये ये माझ्याकडे ये.’ तेवढयात कडूलिंब हसत हसत म्हणाला, ‘अरे येड्या माझ्या कडे ये बघ माझं तारुण्य. हो तरुण चल दोघ मिळून आनंदाने राहू या तारुण्याची मजा लुटू या’ आता चिमणा पुरता गोंधळून गेला.
पाडस, वड व कडूलिंब हे एकदाच त्याला बोलावत होते. म्हणजे बालपण, तारुण्य व म्हातारपण त्याला बोलावत होते, खुणावत होते. आता काय करावं? बालपण स्विकारावं का की तारुण्यातच जगावं कि म्हातरपण स्विकारावं हे त्याला कळालं नाही. कोणाकडे जावे हे त्याला कळत नव्हते. तो पूरता गोंधळून गेला म्हणून त्याने बोंबलत बोंबलत गावाकडे धूम पळाला. तो चिमणा बोबलताना गावातील लहानथोर यांनी ऐकले, पाहिले व सर्वांनीच बोबलायला सुरवात केली. तेव्हा पासून फाल्गुन महिन्यात लोक बोंबलतात. जेव्हा आपण आडचणीत येतोत, संकटात येतोत तेव्हा आपण ही बोंबलत असतोत, नाही का?
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड-६