
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- 100 कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण, आता चांदिवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे देशमुखांना क्लिन चिट मिळणार, असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता.
या प्रकरणी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे कामकाज पूर्ण झाले आहे. २३ मार्चला सीलबंद अहवाल तयार होणार आहे. आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी युक्तीवाद केला आहे. १०० कोटी वसुलीची गंभीर घटना दोघांनीही स्टेशन डायरीत नोंदवली नाही. स्टेशन डायरी हे पोलिसांकरता महत्वाचे साधन आहे त्याचा वापर केला नाही. सचिन वाझेने १०० कोटी वसुलीबाबत वरिष्ठांकडे कधीच लेखी तक्रार केली नाही, असा युक्तिवाद हिरे यांनी केला. तसंच, परमबीर सिंग यांनी २० मार्च २०२१ च्या आधी पर्यंत कधीच १०० कोटी वसुलीबाबत पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली नाही.
२० मार्चपूर्वी १०० कोटी वसुली प्रकरण सुरु होते त्याची कुठे ही एफआयआर केली नाही, असाही युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे अनिल देशमुख यांना क्लिन चीट मिळण्याची दाट शक्यता आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे आरोप वैध नाहीत. सरकार दरबारी १०० कोटी वसुलीचे कुठेही आरोपाची नोंद नसल्याने अनिल देशमुख यांना दिलासा मिळू शकतो, असा निष्कर्ष या अहवालावरून काढला जात आहे. त्यामुळे आयोगाच्या अहवालानंतर अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळतो का हे पाहण्याचे ठरणार आहे.