
दैनिक चालु वार्ता
अमृतसर :- देशात ५ राज्याच्या निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेचे वेध लागले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसची दाणादाण उडवली आहे. याठिकाणी सत्ताधारी काँग्रेसचा सुपडा साफ करत अरविंद केजरीवाल यांच्या ‘ आप’नं स्पष्ट बहुमत आणलं आहे. आता आपच्या नवीन सरकारमधील मंत्र्यांचा १९ मार्चला शपथविधी पार पडणार आहे. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होईल. त्याआधी आज सर्व ११७ आमदारांना शपथ दिली जाईल. बुधवारी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आम्ही पंजाबमधील बेरोजगारीपासून शेती, उद्योग, शाळा, हॉस्पिटल यात सुधारणा आणू. भ्रष्टाचाराला आळा घालू. हे काम खूप आव्हानात्मक असले तरी आम्ही ते करून दाखवू.
दिल्लीत परदेशातून लोकं शाळा आणि मोहल्ला क्लीनिक पाहण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे पंजाबमध्येही येतील. आम्ही आतापासूनच यावर कामाला सुरूवात करू असं त्यांनी सांगितले.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने राज्यातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी कामाला सुरूवात करणार असल्याचं म्हटलं आहे. १९ मार्च रोजी मंत्र्यांच्या शपथविधीनंतर पहिलीच कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान राज्यातील जनतेसाठी मोठे निर्णय घेतील असं बोललं जात आहे. महाराष्ट्रात अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारला अद्याप जमलं नाही ते ‘आप’ सरकार पंजाबमध्ये पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.