
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- आगामी २०२४ मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार येईल, असा विश्वास भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपला सत्तेत येऊ देणार नाही. पवारांच्या या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.
२० वर्षांमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही. त्यांनी भाजपची (BJP) चिंता करु नये, असा सल्ला त्यांनी पवारांना दिला. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. फडणवीसांना महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रीपदावर पुन्हा बसवण्यासाठी भाजप १०६ आणि शिवसेनेचे ५५ आमदार असे एकूण १६१ आमदार निवडून दिले. मात्र तुम्ही विश्वासघात करुन सत्तेत आला, असे पडळकर म्हणाले. राज्यातील जनता भारतीय पक्षाबरोबर आहे.
त्यामुळे तुम्ही कितीही संघर्ष केला, २०१९ मध्ये साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नसल्याची टीका पडळकर यांनी शरद पवारांवर केली. त्यांना ५४ ची संख्या टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. घाबरु नका, काळजी करु नका, असे त्यांना सांगावे लागतयं. मात्र तुमच्या हातात काही नाही, असे ते म्हणाले.