
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
जालना :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी आणखी एक विधान करत खळबळ उडवून दिलीय. महाविकास आघाडीचे जवळपास २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा रावसाहेब दानवेंनी केलाय. पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांत भाजपचं सरकार आलंय. त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालंय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण त्यांनी तसे केले नाही.
निवडणूक आल्यानंतर एक एक आमदार भाजपच्या वाघोरीत येतील, असंही दानवे म्हणालेत. ज्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडलं आणि त्यांच्या जाऊन मिसळले, तेव्हाच त्यांचा भगवा रंग संपला. त्यांनी आता हिरवं पांघरूण घेतलं असून, हिरव्याचं समर्थन केल्याचंही रावसाहेब दानवेंनी सांगितलंय. महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं सांगून त्यांच्या आमदारकी धोक्यात घालायची नाही, असं म्हणत ज्यांची मौत आलीय, ते खड्ड्यात जातील. भाजपमध्ये असे कोणीच नाही, ज्यासाठी हे खड्डे खोदू शकतील, असंही दानवे म्हणालेत.
आम्ही कधीच पाठीत वार केलेला नाही. यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी तसं केलं. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आता राहिलेली नाही. सध्याची शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांची असल्याचा टोलाही दानवेंनी लगावलाय. दाऊदसारख्या बॉम्बस्फोटातील आरोपीच्या पाठी उभा असलेला मंत्री जेलमध्ये गेला, तरीसुद्धा त्यांची अरेरावी सुरू आहे. ती राज्यातील जनता कदापि सहन करणार नसल्याचंही रावसाहेब दानवेंनी ठणकावून सांगितलं.
दुसरीकडे भाजप नेते निलेश राणेंनीही शरद पवारांवर निशाणा साधलाय. भाजपची सत्ता पवार साहेबांना कशी परवडेल कारण त्यात दाऊदचा सहभाग नसेल. पवार साहेबांनी खरं जनमत घेतलं तर त्यांना कळेल त्यांच्या राजकारणाचा आता लोकांना कंटाळा आलाय, मोठी लॉटरी एकदाच लागते पवार साहेब नेहमी नाही, असंही निलेश राणे म्हणालेत.