
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सध्याची मुदत तर पुर्ण करेलच पण आम्ही सन 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीतही सत्ता कायम राखू असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. या वक्तव्याद्वारे त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. भाजकडून सरकार पडण्याच्या सतत नवनवीन तारखा दिल्या जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेजारच्या गोव्याप्रमाणेच पुढील निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजप स्वबळावर सत्तेवर येईल, असे म्हटले होते.
फडणवीस यांच्या या टिप्पणीबद्दल विचारले असता, राऊत म्हणाले की, फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी होते आणि त्या राज्यातील विजयाने त्यांना असे भाकीत करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे, पण गोवा काय आहे हे फडणवीसांना लवकरच कळेल, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांनाही गोवा समजला नाही. त्यामुळे तो फडणवीसांनाही इतक्यात समजणार नाही. अनेक राजकीय पक्षांनाही ते समजू शकले नाही, असे ते म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी भाजपवर महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीची खेळीमेळीची राजकीय संस्कृती आणि विनोद नष्ट केल्याचा आरोप केला. पुर्वी लोक मनमोकळेपणाने बोलायचे, विनोदही करायचे पण लोक आता साधे बोलायलाही घाबरतात. अशी परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती. दुर्दैवाने भाजपमधील आमच्या मित्रांनी हे केले आहे, असे ते म्हणाले.