
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- गेल्या चार महिन्यांपासून तुला गलितगात्र झालेल पाहत राहण्याची वेदना थांबली.. तुला तस पाहण शिक्षाच होती ग.. वार्धक्यात अस असू शकत, शरीर नश्वर आहे. इ. सगळ ठाऊक असूनही तुझी ‘उत्साहमूर्तीची प्रतिमा मनातून हलतच नव्हती. कारण तू म्हणजे ऊर्जा. एका रुपातून दुसऱ्यात रुपांतरित होणारी ‘ पण अक्षय! तू म्हणजे चैतन्य होतीस तुझ्या असण्यानेच मनांसह आसमंतालाही प्रफुल्लित करणारी. तू सगळ्यांसाठीच ‘आई’ होतीस. मृदुतेला कठोरतेच कोंदण न कधी कधी जाचक वाटणाऱ्या शिस्तीलाही मायेची झालर असणारी.
तुझ्या सहजतेत सौंदर्य होत. कुणाला उपदेश न करता, वागण्यानेच धडा द्यायचीस. तू अपार कष्ट करतेस हे पाहून कुणालाही कळायच कष्टाला पर्याय नाही. सर्व करा कामधंदा | चित्ती भजावे गोविंदा या वृत्तीने जगत राहिलीस. तुझ स्वतःचच एक तत्त्वज्ञान होत. तत्वज्ञान म्हणते केवळ शब्द नसतात, तर ते आपल्याला जगवत असत, हे तुला पाहून पुन्हा पटत राहील. तु कधिच संभ्रमित नव्हतीस. तु जगलीस ती परिस्थिती कधीच आदर्श नव्हती; पण प्रतिकुलतेला अनुकूल करीत गेलीस ग.. त्याची किंमतही चुकवली. झिजलीस. ‘कोणत्याही गोष्टीचा पूर्ण स्वीकार किंवा नकार हे तुला जमल होत. म्हणून अकरा लेकरांसह असणारा संसार निष्ठेने केलास. अतिशय कष्ट केले.
धीर म्हणजे काय तुला पाहून कळत होत. तू भूमिकन्याच होतीस काळ्या मातीत राबलीस. तिच्यातील मार्दव- दातृत्व स्वत:मध्ये जपलस. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते ते तुला पाहून उमजायच. मुलींचा विशेष हरीख होता तुला. पोरगी पायजेच असा हट्टही. माझ्या सगळ्या मुली कष्टाळू आहेत. सरोजिनी सगळे काम करून डॉक्टर झाली. हे कायम अभिमानाने सांगत राहिलीस. स्वतःच्या पाच लेकींसह इतरही अनेक लेकींच माहेर झालीस. आईवडिल नसणाऱ्या कितीतरी पोरींचे त्यांच्या गर्भारपणी लाड केलेस. डोहाळेजेवण केलीत. बेलोन्याची लेकबाय तिच्या सासरी वारली. पण माहेरी आता कुणी नाही. तर कितीजणीचा ‘तिसरा दिवस’ माहेर म्हणून केलास.
तू गेल्यानंतर, तुझ्याजवळ काही काळ राहून गेलेल्या कितीतरी तुझ्या लेकी डवडबलेल्या डोळ्यांनी सांगत होत्या ग आज जे आमच्यात चांगल आहे, ते आईन दिल होत. तिने घडवल. खरं म्हणजे ‘स्त्री’ असण्याचच तुला भुषण होत. दुसरा जन्म कुणाचा मागाल ? यावर तू सस्मित सांगितल होतस ‘बाईचाच बरा’ स्त्रीवाद न वाचताही अनेक स्त्रियांना आत्मभान देणारी, आत्मसन्मान जपणारी पुरुषार्थ’ करणारी पूर्ण स्त्री होतीस तू. प्रत्येक नात्याला समृद्ध करणारी होतीस. सुनेसाठी तिच्या क्षमतांची तिला जाणीव करून देणारी सासू •वीस नातवंडांसाठी आभाळमाया असणारी फ्रेंड आज्जी. लेकीसाठी कणखर आई न सखींसाठी आधार.
माझी हक्काची श्रोता होतीस तू.. खर म्हणजे जी.पी.एफ. गाईड- फिलॉसॉफर फ्रेंड व्यवहारात एखादी जबाबदारी सांभाळतांना सहज सांगायचीस बटा. घर असो का शाळा आपल्या पूर्ण जागेत एक चक्कर रोज मारला पाहिजे..’ म्हणून कॉलेज कॅम्पस फिरतांना कायम हुरुपच वाटला. माणसांच्या स्वभाव छटांमुळे कधी निराश झाले. अस वाटल तर बोलायचीस. ढेकण झाले म्हणून कोणी बिछाना सोडत नसते. खंबीर राहिलो पाहिजे. सखी म्हणून सांगायची सासुरवाशिन बाईन झोपतांना विचार करायचा की आपण आपल्या माहेरी आहो. अन खुशाल आनंदान झोपी जाव. मी आता तळवेलला ( माहेरी ) चाल्ली व अस सांगूनच तू रोज झोपायचीस डोक्यावरचा पदर नीट घेऊनच.. या पदराचा तुला कायमच लोभ होता.
शेवटपर्यंत तू पदर घ्यायला शिकवलास – मर्यादिच महत्व अधोरेखित केलस. पदरात घ्यायला सांगितलस मोठ्या मनान क्षमा करायला वेळ आल्यावर पदर खोचायलाही शिकवलस कठीण समयाला सामोर जायला. तू कधी कठीण काळी डगमगली नाहीस. सुखात हरवली नाही. दुःखात उन्मळून पडली नाहीस. ‘सुखी संतोषा न यावे.. हे जणू जगून दाखवलस सेवावृत्तीच बीज’ तर तुझ्यातच होत, जे बच्चुजींसह इतरही मुला-मुलींमध्ये रुजल.. फुलल.. दया म्हणजे काय हे नेमक कळल होत. ‘ दया तिचे नाव भूतांचे पाळण’ भूत म्हणजे प्राणिजात | जे निष्पाप आणि दुर्जन पिडीत जयांचा पक्ष रक्षणे यथार्थ या नाव दया ॥ दुर्बलांसह उभी राहण्याची हिम्मत बळ हे तुझ शक्ती स्थळ होत.
आई, तुझ्या या स्वभावाच मूळ तुझ्या माहेरच्या संस्कारांमध्ये होत. तळवेल चे थोर सत्पुरुष वैं ओंकारराव बोंडेची तू लेक. लौकिकार्थाने संपन्न माहेर. वडिल ज्ञानेश्वर माऊलींचे अनन्य भक्त व ज्ञानेश्वरीचे अधिकारी साधक या अर्थाने तुझ माहेर श्रीमंत होत. या संस्कारांची श्रीमंती तू कायम जपलीस म्हणून गृहस्थाश्रमी तुला उदार होता आल. बच्चुजीसह असणाऱ्या शेकडों कार्यकर्त्यांना तुझ्यात माय दिसली. अन्नपूर्णेच्या रुपात तू कायम सगळ्यांना मायेचा घास देत राहिलीस. या भक्तीच्या संस्कारांनी तुला संत मारोती महाराज, संत पिसाटे महाराज, सद्गुरु महाराज या संतांची सेवा करण्याचे व कृपापात्र होण्याचे सदभाग्य लाभले या मुळेच तू कर्तृत्व गाजवलस एक नेतृत्वही दिलस सर्वच लेकरांना देणाऱ्याचा हात दिलास; तरीही अहंकाराचा वारा न लागता अलिप्त राहिलीस शेवटपर्यंत तुझा आवडीचा अभंग गात होतीस.
‘देह हा काळाचा धन कुबेराचे निमित्ताचा धनी केला असे प्राणी’ हे तुला आकळल होत. म्हणून कोणत्याही भावात न जाता कायम आनंदात स्थिरावलीस शेतात सोबतीने काम करणारी बाई असो की घरातल्या लेकी सुना तू सगळ्यांशीच आनंदात असायचीस. खळखळून हसायची.. प्रत्येक क्षण सेलिब्रेट ‘करणारी ‘सेलिब्रेटी’ होतीस तू.. या आनंदाला कायम माहेरच्या विठोबा-रखुमाईच्या स्मरणाची किनार असायची. आई असार संसारात भगवंताच्या स्मरणासह पुरुषार्थ करीत आनंदी राहण्याचा हा स्वभाव ठेव म्हणून आमच्यात ठेव.
डॉ.सौ.नयना बच्चू कडू