
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
बुलडाणा दि .२३ :- जिल्हास्तरीय सेतू समिती बुलडाणा यांच्याकडून आपले सरकार केंद्र स्थापन करण्या बाबतच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या असुन त्या प्रसिध्द झालेल्या यादी मध्ये बुलडाणा शहरातील काही भागांना जाणिवपूर्वक वंचित ठेवलेले आहे असेच दिसते. करिता या केंद्रामध्ये जास्त लोकसंख्या असलेल्या मागास व मुस्लीम बहुल भागांमध्ये वाढीव केंद्र द्यावे अशी मागणी बुलडाणा शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव, जिल्हास्तरीय सेतू समिती, बुलडाणा यांच्यामार्फत बुलडाणा जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याबाबत सुशिक्षीत बेरोजगार यांच्योकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बुलडाणा शहरातील गणेश नगर, कारंजा चौक, एकता नगर, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह बिल्डींग, मुठ्ठे ले आऊट या ठिकाणी जागा रिक्त दर्शविण्यात आलेला आहे. यामध्ये मागास किंवा मुस्लीम बहुल क्षेत्रासाठी एकही आपले सरकार केंद्र देण्यात आलेले नाही. शहरातील आंबेडकर नगर, मिलिंद नगर, चंद्रमणी नगर, भिंम नगर, इंदिरा नगर, जोहर नगर, इकबाल चौक या व अश्या अनेक भागांमध्ये मागासवर्गीय व मुस्लीम नागरिकांची लोकसंख्या जास्त असून येथे सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रमाणही जास्त आहे.
त्यामुळे एकता नगर, गणेश नगर, कारंजा चौक याप्रमाणे मुस्लीम व मागास बहुल भागातही सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी व नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपले सरकार केंद्रांची संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी शहर वंचित बहुजन आघडीच्या वतीने शहराध्यक्ष मिलिंद वानखडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे. मागण्यांची पुर्तता न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी विनंती वजा इशारा शहर अध्यक्ष यांनी या वेळी दिला.