
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन ९ ते ११ एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.विपीन यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक संपन्न झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व यंत्रणाना सकारात्मक सहभाग घेवून हा महोत्सव अधिक चांगला होण्याबाबतचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या निदेर्शानुसार बैठकीत विविध नियोजनाचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा घेतला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, देगलूरचे उपविभागीय दंडाधिकारी शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महोत्सवाच्या पुर्व तयारीबाबत आढावा घेवून विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. या महोत्सवाला अधिकाधिक पर्यटक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती-रसिक मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या तीन दिवशीय महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारासह राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांनाही ऐकण्याची संधी मिळणार आहे.