
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- कॉंग्रेसच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागल्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी अधिकच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी लोकसभेत इंधन दरवाढीचा निषेध केला.
लोकसभेत विरोधकांनी इंधन दरवाढीविरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याचे पडसाद प्रश्नोत्तराच्या तासावेळीही उमटले.
त्यावेळी सोनिया कॉंग्रेसबरोबरच इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांना प्रश्नोत्तराच्या तासात सहभागी न होण्याच्या सूचना देताना दिसल्या. नॅशनल कॉन्फरन्सचे एक सदस्य प्रश्न विचारण्यास उभे राहिले. मात्र, सोनियांनी त्यांना जागेवर बसण्यास सांगितले अन् संबंधित सदस्याने त्या सूचनेचे पालन केले. त्यानंतर आययूएमएलच्या एका सदस्याचे नाव प्रश्न विचारण्यासाठी पुकारण्यात आले. मात्र, सोनियांनी त्या सदस्याला इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले.
सोनियांच्या सक्रियतेमुळे कॉंग्रेस सदस्यांचा आवाज आणखी बुलंद झाल्याचे चित्र सभागृहात पाहावयास मिळाले. नुकत्याच पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसची पीछेहाट कायम राहिली. त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थतेने पुन्हा डोके वर काढले. त्याशिवाय, विरोधी पक्षांना एकवटवण्यात कॉंग्रेस पुढाकार घेत नसल्याची नाराजी काही पक्षांचे नेते बोलून दाखवत आहेत. त्यापार्श्वभूमीवर, सोनियांची सक्रियता बोलकी ठरत आहे.