
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दिल्ली :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे कालचे लोकसभेतील भाषण चांगलेच गाजले. १ तासाच्या या भाषणाला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील बाक वाजवून दाद दिली. यावेळी बोलताना गडकरींनी अनेक लोकप्रिय घोषणा केल्या. यात राष्ट्रीय महामार्गावर ६० किलोमीटरच्या अंतरात दुसरा टोल असणार नाही. सोबतच स्थानिकांना टोलबाबत पासची सूट मिळणार. यासाठी आधार कार्ड प्रमाण मानलं जाईल अशा लोकांच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित काही घोषणांचा समावेश होता.
मात्र आता नितीन गडकरी यांच्या या लोकप्रिय घोषणेचा बुडबुडा फुटला आहे. कारण ६० किलोमीटर अंतराच्या आत असलेले सगळेच टोल हटवले जाणार नाहीत, काही अपवादही असू शकतात असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय त्याआधीचे काही टोल हटवण्यासाठी अभ्यासही करावा लागेल. असेही स्पष्ट करण्यात आले आहे. २००८ ला हा नियम आला आहे, पण अद्याप या नियमाची अंमलबजावणी होत नव्हती.
त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा गडकरींनी केली होती. या सोबतच स्थानिकांना टोलबाबत पासची सूट मिळणार आहे. पण त्यासाठी किती किलोमीटरची मर्यादा गृहीत धरली जाणार याबाबतही मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. ही सूट शहरी भाग वगळता कमीत कमी ५ तर जास्तीत जास्त १० किलोमीटर अंतरावरच्या गावांना असू शकते. महानगरपालिका क्षेत्रातील टोलला अशी कोणतीही सवलत लागू होणार नाही, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.