
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
दिल्ली :- जगातील ताकदवान देशांची संघटना असलेल्या G20 मधून रशियाला वगळण्याच्या अमेरिकेसह पाश्चात्य देशांच्या मागणीवर चीनने स्पष्टीकरण दिले आहे. युक्रेनवरील हमल्यानंतर जगभर एकाकी पडलेल्या रशियाला चीनकडून सातत्याने पाठिंबा आणि सहकार्य मिळत आहे. G20 हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा मुख्य मंच असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबीन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, रशिया हा या गटाचा महत्त्वाचा सदस्य आहे आणि अन्य देशांकडून कोणत्याही देशाला बाहेर काढण्याचा अधिकार नाही.
रशियाला G20 मधून बाहेर काढण्याचा विचार सुरू झाला असताना चीनने हे रशियाला पाठिंबा देणारे वक्तव्य केले आहे. चीनचे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेच्या वरिष्ठ सुरक्षा मार्गदर्शकाने युक्रेनवरील हमल्यानंतर रशियाने आंतरराष्ट्रीय मंचांवरून माघार घ्यावी यासाठी अमेरिका दबाव निर्माण करील, असे संकेत दिले होते. व्हाइट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शक जॅक सुलिव्हन म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियासाठी आधीसारखी परिस्थिती आता असणार नाही.
G20 हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा एक समूह आहे ज्याचा उद्देश जागतिक अर्थव्यवस्था, हवामान बदल आणि विकास यांसारख्या जगावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर एकत्र काम करणे हा आहे. जर रशिया या गटातून बाहेर पडला तर त्यावर पाश्चिमात्य देशांकडून रशियावर टाकण्यात येत असलेल्या निर्बंधांत आणखी वाढ झाली असे म्हणता येईल, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे मत आहे. तथापि, असे मानले जाते की भारत, चीन आणि सौदी अरेबिया सारखी राष्ट्रे जी-20 मध्ये रशियाच्या समर्थनासाठी व्हेटो करू शकतात.
त्याच वेळी, काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की G7 ची पाश्चात्य आघाडी यावर्षात इंडोनेशियामध्ये होणार्या G20 बैठकीवर बहिष्कार टाकेल. याआधी रशियाही G7 देशांचा सदस्य होता. रशिया 2000 मध्ये सामील झाल्यानंतर त्याचे नाव G8 ठेवण्यात आले होते परंतु 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केल्यानंतर या संघटनेतून रशियाला काढून टाकण्यात आले होते.