
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
भाजप मधील या दिग्गजांची नावे चर्चेत!
नवी दिल्ली :- देशात 2022 मध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे यंदाचे वर्ष राजकीयदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सर्वाधिक लक्ष लागलेले असेल, ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीकडे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढील राष्ट्रपती कोण असणार, याची आतापासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे.
सत्ताधारी भाजपाकडे भक्कम बहुमत असून, विविध प्रमुख राज्यांमध्येही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजप बोट ठेवेल ती व्यक्ती राष्ट्रपती होणार, हे नक्की..! या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रपतिपदासाठी चार नेत्यांची नावं आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. भाजपच्या या नेत्यांमध्ये थावरचंद गहलोत, आरिफ मोहम्मद खान, आनंदीबेन पटेल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा समावेश आहे.
थावरचंद गहलोत
भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असणारे थावरचंद गहलोह हे सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत. तत्पूर्वी ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांनी भाजपच्या संसदीय बोर्ड आणि केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप त्यांना उमेदवारी देऊ शकतो.
आरिफ मोहम्मद खान
उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमधील रहिवासी असलेले आरिफ मोहम्मद खान हे सध्या केरळचे राज्यपाल आहेत. शाहबानो खटल्यानंतर त्यांनी राजीव गांधी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ट्रिपल तलाक, सीएए आंदोलनावेळी त्यांची भूमिका भाजपसाठी मदतगार ठरली होती. त्यांना राष्ट्रपती बनवून भाजप व संघ आपण मुस्लिमविरोधी नसल्याचा संदेश देऊ शकतात..
आनंदीबेन पटेल
आनंदीबेन पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री असून, सध्या त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. त्यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी देऊन भाजप 2024 च्या निवडणुकीपूर्वी महिलांना मोठा संदेश देऊ शकते. मात्र, सध्या आनंदीबेन पटेल यांचे वय 80 वर्षे असल्याने ही बाब त्यांच्यासाठी नकारात्मक ठरू शकते.
व्यंकय्या नायडू
मूळचे आंध्र प्रदेशमधील व्यंकय्या नायडू हे सध्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत. तत्पूर्वी ते केंद्रीय मंत्री होते. भाजपमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. 2002 ते 2004 या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. 2017 मध्ये त्यांची उपराष्ट्रपतिपदी निवड झाली होती. त्यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी देऊन भाजप दक्षिण भारतात पाया मजबूत करु शकते.