
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- आयपीएल प्रेक्षपणाच्या अधिकारासंदर्भातील जुन्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना दिलासा देणारा आणि बीसीसीआयला मोठा धक्का देणारा निर्णय आहे. ललित मोदी हे आयपीएलचे अध्यक्ष होते ज्यांना बीसीसीआयने 2010 मध्ये निलंबित केले होते. सेवा शुल्क प्रकरणात बीसीसीआयने ललित मोदींवर दोषीचा ठपका ठेवत त्यांच्यावर आजीवन बंदीची कारवाई केली होती. मात्र ललित मोदींनी स्वत:ला निर्दोष सिद्ध केले आहे. याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएल मीडिया राइट्स प्रकरणात ललित मोदीला क्लीन चिट दिली आहे.
ललित मोदी यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर वक्तव्य करताना हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. बीसीसीआय आणि ललित मोदी यांच्यात 13 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. 2009 मध्ये, BCCI ने वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप इंडियासोबतचा आयपीएल मीडिया हक्क करार रद्द केला, त्यावेळी आयपीएलचे अध्यक्ष ललित मोदी होते. याशिवाय बीसीसीआयने त्याच्यावर 2013 मध्ये अनुशासनहीनता, आर्थिक अनियमिततेचा आरोप करत आजीवन बंदी घातली होती.