
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातील संबंधित प्रकरणे सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. निर्णयामुळे राज्य सरकारला एक मोठा झटका बसला आहे. या मुद्द्याचा धागा पकडत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे निर्लज्जम् सदा सुखी म्हणत न्यायव्यवस्थेने महाविकास आघाडी सरकारला दोनदा सनसनाटी चपराक लगावली,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
या दरम्यान, याआगोदर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सध्याच्या वातावरणात कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचं वक्तव्य केलं होतं. संजय राऊतांनी केलेल्या विधानाचा अप्रत्यक्ष दाखला देत जोरदार टीका केली. दरम्यान, आज (गुरूवारी) परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना खंडपीठाने संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली. ‘प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आम्हाला चिंता वाटत नाही.
परवा महाराष्ट्र सरकारमधील एका व्यक्तीने असं विधान केलं की आता त्यांना कोर्टाकडून योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही.
आम्ही हे वाचलं, पण या गोष्टींमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. अशा वक्तव्यांची जागा आमच्यासाठी केराची टोपली आहे’, असं न्यायालयाने राऊतांना फटकारलं होतं. दरम्यान याच मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.