
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
– जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी बैठक
– विद्यार्थी, सायकल प्रेमी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
– अडीच हजार सायकल प्रेमींनी केली नोंदणी
– गुगल फॉर्म लिंक व क्यूआरकोड व्दारे करता येईल नोंदणी
भंडारा, दि. 24 :- पर्यावरणपुरक प्रयासाबद्दल नागरिकांमध्ये जाणीव जागृती होण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत येत्या मंगळवारी 29 मार्चला भव्य स्तरावर सायकल परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या परेड आयोजनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली. 7 किलोमीटर अंतर मार्गक्रमण करत निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
या दरम्यान उपस्थित सायकलस्वार हे भारतीय ध्वज रंगावलीच्या टोप्या परिधान करून विशाल मानव श्रृंखलेच्या माध्यमातून तिरंगा साकारणार आहे. या सायकल परेडमध्ये साधारण 2 हजार नागरिकांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायकल परेडचे आयोजन असणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त, आजादी का अमृत महोत्सव उपक्रमा अतंर्गत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिका प्रशासनच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे.
आतापर्यंत 2 हजार 500 नागरिक, गृहिणी, विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे. तरी सायकल परेडमध्ये विद्यार्थी, सायकलपटू, खेळाडू यासह सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
नागरिकांना सायकल परेड मध्ये सहभाग नोंदविण्याकरिता जिल्हा प्रशासना मार्फत गुगल फॉर्म लिंक तसेच क्यूआरकोड तयार करण्यात आले असून गुगल फॉर्म लिंक (https://forms.gle/yey4525JZMsBRK3B7) द्वारे माहिती भरून अथवा क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी फॉर्म भरून सहभाग नोंदविता येईल.
तसेच https://bhandara.gov.in/ या संकेतस्थळावर सुध्दा लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी सोबतच ऑन द स्पॉट नोंदणी करता येईल. यादृष्टीने आज सायकल परेडच्या मार्गाची साफसफाई नगरपरिषदेने केली आहे. रेल्वे ग्राऊंड, खात रोड भंडारा येथे सायकल परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल परेडचा मार्ग रेल्वे ग्राऊंड , खात रोड भंडारा – खुर्सिपार नाका – रेल्वे ग्राऊंड, खात रोड या मार्गावरून ही सायकल परेड जाणार आहे. त्या दिवशी सुरळीत वाहतुकीच्या अनुषंगाने आदेश लवकरच पारित करण्यात येतील.
या सायकल परेडची पूर्वतयारी करिता खात रोड येथील मैदानाची व परेड मार्गाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली, व अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सदर सायकल परेड मध्ये नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी भंडारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नगरपालिका प्रशासन शाखेतील 9822489123 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.