
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- सध्या विविध मुद्यांवरुन देशातील राजकारण तापत असल्याचे चित्र दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या प्रश्नांवरुन आमने सामने येत आहेत. नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखण्यात यश मिळवलं आहे. तर काँग्रेसला जोरदार धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपला जनाधार वाढवण्यात सलग यशस्वी होत असलेला भाजप आणि दुर्बल होत चाललेला काँग्रेस पक्ष अशा राजकीय स्थितीत प्रादेशिक पक्षांनीही जोरदार तयारी चालवली आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये शक्ती असलेले 10 प्रादेशिक पक्ष नवीन राजकीय गणित मांडत आहेत. दरम्यान, प्रादेशिक पक्षांच्या पडद्याआड सुरु असलेल्या या हालचाली आता दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे एम. के. स्टॅलिन यांच्या पुढाकाराने एक परिषद बोलावण्याची तयारी सुरु आहे. ही मोहीम रेटण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव 30 मार्चला दिल्लीत दाखल होणार आहेत.
10 राज्यांच्या मुख्यमंत्री संभावीत आघाडीत सामील असण्याची चर्चा सध्या सुरु आहे. भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात ही आघाडी होणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाला एक तिसरा पर्याय उभा करण्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मध्यंतरीत्यांनी याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला होती.
यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी होण्याच्या चर्चा सध्या सुरु आहे.