
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी-परतवाडा रस्त्यावरील पारीख पेट्रोल पंपा समोरील फुटपाथवर असलेल्या दोन दुकानांना २७-०३-२०२२ रविवारला सकाळी ४ वाजताच्या सुमारास आग लागली.आग इतकी भीषण होती की ज्यामुळे दुकानातील साहित्य जळून भस्मसात झाले.उपस्थितांनी आग लागल्याची माहिती नगरपरिषद अग्निशमन दलाला दिली असता अग्निशमन दलाचे जवान अरुण माकोडे,अब्दुल कलाम,गौरव इंगळे हे घटनास्थळी पोहचताच त्यांनी आपले कर्तव्य बजावत आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळविले.ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.उपस्थितांच्या चर्चेवरून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्तमाहितीनुसार अंजनगाव सुर्जी-परतवाडा रस्त्यावरील पारीख पेट्रोल पंपासमोर फुुुटपाथ वर गुड्डू अन्सारी यांची हिंदुस्तान टायर वर्क व राजेश गंगाधर चोरपगार यांची चहाची कॅन्टींग,रसवंती व पान टपरीचे दुुकान आहे.या दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली ज्यामुळे दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.हिंदुस्तान टायर वर्क्स दुकान मधील हवा मशीन चार नवीन टायर व काही जुने टायर असे अंदाजे ३ लाख रुपये व राजेश चोरपगार यांच्या कॅन्टींन,रसवंती व पान टपरी मधील सर्व साहित्य जळून नष्ट झाले असून अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली.
नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून पो.काँ.गोपाल सोळंके व त्यांचे सहकारी हे सकाळी गस्तीवर असतांना त्यांना आग लागल्याचे उपस्थितांनी कळविले व त्यांनी अग्निशमन दलाचे जवान अरुण माकोडे यांना फोन केला व आगीची माहिती दिली.माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले व बाजूला असणाऱ्या दुकानांना तसेच समोर असलेल्या पेट्रोल पंपाला झळ पोहचू दिली नाही.झालेल्या नुकसानीमुळे सदर दुकानदारांचे आर्थिक नुकसानीमुळे संकटाला सामोरे जावे लागत आहे.घटनेची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.