
दैनिक चालु वार्त
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- पुणे येथून मलकापूरला जाणारी ट्रॅव्हल बस अजिंठा गावाजवळ असलेल्या भारत दर्शनजवळील वळणावर तिचे लायनर चिपकून टायर फुटल्याने बसला आग लागली. आग लागल्याचे पाहताच चालकाने बसमधील २८ प्रवाशांसह चालक, वाहकाला खाली उतरविल्याने सुदैवाने पुढील दुर्घटना टळली. मात्र, या आगीच्या भक्ष्यस्थानी बस संपूर्णपणे जळून खाक झाली.
पेट्रोलिंगवर असलेल्या अजिंठा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. प्रवासी झोपेत असताना ही घटना घडली. पण, चालकाच्या हे लक्षात येताच त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून प्रवाशांना बाहेर येण्याच्या सूचना दिल्याने सुदैवाने पुढील दुर्घटना टाळता आली. बघताबघता संपूर्ण बस जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, बीट जमादार अक्रम पठाण, भागवत शेळके, संजय ब्राह्मदे, संजय कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सुरज मंडवारे, गजानन मंडावरे, समाधान काळे आदींच्या मदतीने आग आटोक्यात आणून प्रवाशांना दुसऱ्या वाहनात बसवून वाहतूक रहदारी सुरळीत केली.