
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
परभणी :- नांदेड जिल्ह्यातील लोहा-अंतेश्वर दरम्यान दिवसाकाठी सहा वेळा जनसेवेत कार्यरत असलेली परंतु मागील कोरोना काळापासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली सर्व सामान्यांची जीवन वाहिनी ठरलेली लाल परी, राज्य परिवहन सेवेची बस, अर्थात एसटी सेवा पूर्ववत्त तात्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी अंतेश्वरचे भूमीपुत्र, समाजसेवक दत्तात्रय कराळे यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील व लोहा तालुक्यातील शेवटचे गाव अंतेश्वर हे सर्वांगीण विकासापासून सातत्याने वंचित राहिले आहे.
ग्रामस्थ-शेतकर्यांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासन स्तरावर आवश्यक अशा नानाविध सुविधा उपलब्ध असूनही त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या जात नाहीत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध असून तो त्या त्या कामांसाठी देणे आवश्यक असूनही दिला जात नाही. लोकसेवेचा वसा घेतलेल्या आमदार-खासदारांबरोबरच स्थानीय स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कार्यरत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून तो उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे तरी सुध्दा संबंधितांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात आहे.
हक्काच्या सुविधा मिळणे क्रमप्राप्त असतांना त्या आणल्या जात नाहीत, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. मागील कोरोना काळापासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली व सर्व सामान्यांची जीवन वाहिनी ठरलेली लाल परी, राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा पूर्ववत्त करणे आवश्यक असूनही ती केली जात नाही. त्यासाठी शेतकरी वर्ग, गोरगरीब जनतेला जाणीव पूर्वक वेठीस धरले जात आहे. शासनस्तरावरून यासाठी तात्काळ प्रयत्न केले जाणे किंवा विविध पक्ष कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहाणे आवश्यक असूनही ते दूर्लक्षीत केले जाते, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
आनंदाची बाब ही आहे की, अंतेश्वरमध्ये गल्लीबोळातून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्यांच्यात कार्य करण्याची जिद्द आहे, त्यांच्यात जोश आहे, परंतु राजकीय अहंकारी जोडे बाजूला ठेवून किमान पक्षी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तरी सर्वांनी मिळून मिसळून एकत्र येणे आवश्यक आहे. मागील कोरोना काळापासून सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली, सर्व सामान्यांची जीवन वाहिनी ठरलेली लाल परी, राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा पूर्ववत्त तात्काळ सुरु करणे क्रमप्राप्त असतांना ती केली जात नाही, हे कशाचे द्योतक म्हणावे, हा खरा सवाल आहे.
सत्तेत सहभागी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या व अशा अनेक मुद्यांवर एकत्र येऊन गावाचा विकास घडवून आणणे महत्वाचे आहे. माझी त्या सर्व मान्यवरांना कळकळीची विनंती राहील की, आपसातील हेवे-दावे, राजकीय अहंकारी जोडे बाजूला ठेवून किमान गावाच्या विकासासाठी तरी सर्वांनी एकत्र बसून तो घडवून आणणे आवश्यक आहे. देशात भाजपाची सत्ता आहे. खासदारांच्या माध्यमातून जे जे मिळवणे क्रमप्राप्त आहे, त्यासाठी त्यांना विनंती करुन त्या सुविधा उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे.
निवडणूका संपल्या की, राजकारणाचा अहंकारही बाजूला ठेवून आपल्या गावाचा, परिसराचा, विभागाचा, तालुक्याचा विकास हेच प्रत्येकाचे एकमेव लक्ष्य राहिले पाहिजे. रस्ते, नाले, गटारे, पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी, कधीही खंडीत न होणारी वीज सेवा, सुलभ शौचालये, घरकुल योजना, शिक्षण, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, रोहयोच्या आणि या व अशा अनेक विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आमदारांच्या माध्यमातून जे जे केले जाणे आवश्यक आहे, त्यासाठी पाठपुराव्याची नितांत गरज आहे.
येत्या गुढीपाडव्यापासून खंडित एसटी सेवा सुरु करुन केवळ अंतेश्वरच नव्हे तर सभोवतालच्या सर्व ग्रामस्थांना बस सेवेची ती एक पर्वणी ठरली जाईल अशी माझी विनंती सर्वांनाच राहाणारे आहे. लोहा, कंधार आणि नांदेड एसटी महामंडळाने सुध्दा या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून ही सेवा पुन्हा सुरू करावी ही विनंती राहाणार आहे. लोहा-कंधारचे सन्माननीय तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनीही या कामी लक्ष घालून संबंधितांना सेवा पूर्ववत्त करण्याविषयीचे आदेश तात्काळ द्यावेत अशी विनंती राहाणार आहे. लोहा – अंतेश्वर दरम्यान यापूर्वी दिवसातून सहा वेळा एसटी सेवा सुरु होती, तशीच पुन्हा कायम राहील यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत अशी आशा आहे.