
दैनिक चालु वार्ता
बारामती प्रतिनिधि
रियाज़ शेख
बारामती :- बारामती येथील अनेकांत एजुकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने शुक्रवार दिनांक २५ मार्च रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते . सदरील कार्यक्रम हा YoutubeLive च्या माध्यमातून ऑनलाईन झाला. सदरील परिषदेचा मुख्य विषय ” ट्रान्सफॉर्मिंग इंडियन ऍग्रीकल्चर फॉर द चॅलेंजेस ऑफ द २१ सेंचुरी” म्हणजेच एकविसाव्या शतकातील भारतीय शेतीपुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय शेतीव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविणे” असा होता. या विषयी बोलताना विभाग प्रमुख डॉ. समाधान पाटील यांनी सांगितले कि, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शेतीवर प्रत्यक्षरित्या अवलंबून असणारी लोकसंख्या आजही ५७टक्के एवढी प्रचंड आहे.
तसेच खेड्यात राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण २०११ च्या जनगणनेप्रमाणे ७१ टक्के इतके आहे. म्हणूनच एवढ्या लोकसंख्येचा आधार असणारे कृषी क्षेत्र हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आहे. कोरोना काळात देखील ग्रामीण अर्थव्यवस्था प्रभावित न झाल्यामुळे आपला देश कोरोनाचा सामना इतर विकसित देशांपेक्षाही उत्तमपणे करून शकला. मात्र अजूनही भारताच्या शेतीक्षेत्राशी संबंधित अनेक उपक्षेत्र उदा. वित्तपुरवठा, आदाने, सिंचन, आयात निर्यात धोरण, करार शेती इ. अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र सुधारणांची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केलेल्या आणि पुन्हा माघारी घेतलेल्या सुधारणांमुळे तर कृषीविषयक सुधारणांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतीक्षेत्रांसमोरील आव्हाने, शेतकरी चळवळी व त्यांच्या मागण्या, या सुधारणा कश्याप्रकारे राबवाव्यात जेणेकरून शेतकरी आणि शासन यांच्यात संघर्ष होणार नाही अश्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि विचार मंथन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे पाटील सरांनी सांगितले.
याच परिषदेची अधिकची माहिती देताना या परिषदेचे आयोजन सचिव म्हणून कार्य करणाऱ्या प्रा. कृष्णा कुलकर्णी यांनी सांगितले कि दिनांक २५ मार्च रोजी सकाळी १० पासून दुपारी ४.३० या काळात हा कार्यक्रम संपन्न झाला. या परिषदेचे कामकाजाचे प्रक्षेपण तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयाच्या Youtube चॅनेलवर लाईव्ह करण्यात येणार आहे. सध्याही पुढे बातमीत दिलेल्या लिंक वर हा कार्यक्रम उपलब्ध आहे.. सदरील कार्यक्रम पाच सत्रात झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरेश बोडखे, संचालक (कायदा व अर्थशास्त्र), कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, हे होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रशेखर मुरूमकर हे होते. डॉ बोडखे यांनी त्यांच्या भाषणात “एकविसाव्या शतकातील भारतीय शेतीपुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय शेतीव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्याचे उपाय” या विषयावर मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. राजू शेट्टी यांनी व्यस्त विदर्भ दौऱ्यातून वेळ काढून कार्यक्रमात भाग घेतला. शेतकरी चळवळीचा इतिहास तसेच या चळवळींच्या प्रमुख मागण्या आणि उपलब्धी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध राजकीय विश्लेषक, स्वराज पार्टी चे संस्थापक आणि दिल्ली येथील जय किसान आंदोलनाचे प्रणेते प्रा. योगेंद्र यादव यांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये राहून शेतकऱ्यांच्या भावना ना दुखावता कृषीविषयक सुधारणा कश्या प्रकार कराव्यात या विषयावर उद्बोधन केले. तसेच प्रश्न उत्तराच्या माध्यमातूनही विचार प्रकटन केले.
चौथ्या सत्रात महाराष्ट्राच्या पहिल्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्रभर बांबू शेतीचा प्रसार करणारे प्रसिद्ध शेतकरी नेते मा. पाशा पटेल यांनी केंद्र सरकारने केलेल्या कृषीविषयक कायद्यामधील मीथ म्हणजे अपप्रचार आणि तथ्य यावर आपले विचार मांडले. तसेच बांबू शेतीचे भवितव्य आणि संधी याचीही माहिती ओघवत्या भाषेत दिली. अंतिम म्हणजेच पाचव्या सत्रात नायजेरिया येथील प्राणिशास्त्रातील तज्ज्ञ मा. बाबालोला आयोडेल सॅम्युएल यांनी आफ्रिकन कृषी क्षेत्रातून शिकण्याजोगे धडे आणि भारतासाठी आफ्रिकन शेतीतील संधी यावर आपले विचार मांडले. कुलकर्णी यांनी पुढे सांगितले कि, या परिषदेसाठी महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनेक विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांनी संशोधनपर लेख पाठवले आहेत जे एका संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित होणार आहेत.
या परिषदेसाठी निमंत्रित केलेले सर्व पाहुणे आले, तसेच तमाम भारतातून या ऑनलाईन कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला व परिषद यशस्वीरीत्या पार पडली. यासाठी या परिषदेच्या आयोजनात सहभागी सर्वांचे तसे तिला यशस्वी करण्यात हातभार असणाऱ्या संर्वांचे प्राचार्य मुरूमकर सर आणि विभाग प्रमुख डॉ समाधान पाटील यांनी आभार मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर हे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक होते. प्राचार्यानी सांगितले कि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात विविध विषयांवर दर्जेदार कार्यक्रमांची मालिका सातत्याने महाविद्यालयात सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून अर्थशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक ख्यातनाम वक्ते निमंत्रित केले होते.
युट्युब च्या माध्यमातून परिषद संपन्न झाल्यावरही अश्या दिग्गजांना घरबसल्या ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी याचा लाभ तमाम विद्यार्थी, संशोधक आणि इच्छुकांनी घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांनी देखील कार्यक्रमासाठी सहकार्य केले आहे. अनेकांत एज्युकेशन सॊसायटीचे अध्यक्ष श्री जवाहर शाह वाघोलीकर आणि सचिव श्री मिलिंद शाह वाघोलीकर यांनी या परिषदेचे आयोजन यशस्वी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.या कार्यक्रमाचे रेकॉर्डेड प्रक्षेपण यु ट्यूबवर बघण्यासाठी लाइव प्रक्षेपण बघण्यासाठी प्रेक्षकांनी https://youtu.be/NcuAZpn5Jkk या लिंक ला क्लिक करावे.