
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे दि.३०:- केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियान २.० अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची जलशपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे आदी उपस्थित होते. भूजल पातळी वाढण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात पाणी अडवून ते जिरविण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत ‘जलशक्ती अभियान २.०-कॅच द रेन’ अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्याने दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ २९ मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आला. एक वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. अभियानाच्या निमित्ताने आज ग्रामपंचायत स्तरावरदेखील जलशपथ घेण्यात आली. शेतकऱ्यांना या अभियानाचा लाभ व्हावा यासाठी पुणे येथील मृद व जलसंधारण कार्यालयात जलशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीमती हांडे यांनी दिली आहे.