
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- चोरीमध्ये चोरलेल्या मालाच्या वाटाघाटी वरूनच दोन संशयित चोरांमध्ये हाणामारी झाली आणि याचा फायदा स्थानिक गुन्हे शाखेने उचलला. एका गुन्हा सोबत आणखी तीन गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश आले आहे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणतात ते यालाच! दोन दिवसांपूर्वीच तीर्थपुरी येथे जबरी चोरी करून सुमारे साडेआठ लाखांचा माल लंपास करणाऱ्या चोरांचा शोध स्थानिक गुन्हे शाखा घेत होती. या तपासादरम्यान त्यांना पिठोरी सिरसगाव येथील एका संशयित चोराचे नाव कळाले आणि त्या अनुषंगाने त्यांनी तपास केला.
गंगाराम व्यंकटी शिंदे हा उसाच्या शेतात लपून बसला असल्याचे समजले. त्याचा शोध घेऊन त्याच्या अंगावरील हाणामारीच्या जखमे विषयी विचारले असता, त्याने तीर्थपुरी येथे टाकलेल्या दरोड्यातील मालाच्या वाटाघाटी वरून त्याचा साथीदार बाबुशा सावळा पवार याने त्याला जबर मारहाण केल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या दोघांनाही विश्वासात घेतले असता त्यांनी यापूर्वी देखील अशा चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. जाफराबाद तालुक्यातील पिंपळखुटा येथे देखील रामदास खोसरे हे रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.
त्यांच्या घरी दुसरा कोणीही पुरुष नसल्याचे पाहून शेत वस्तीतील त्यांच्या घरात दरोडा टाकून चार लाख 13 हजार रुपयांचे दागिने लंपास केले होते. तीन महिन्यांपूर्वी हा दरोडा टाकल्यानंतर पाच-सहा दिवसांनी लगेचच घनसांवगी तालुक्यातील खडका येथे दरोडा टाकला आणि त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वीच तीर्थपुरी येथेही अशाच प्रकारचा दरोडा टाकला आहे. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गंगाराम शिंदे याचा साथीदार बाबुशा सावळा पवार याला गोंदि तांडा येथून ताब्यात घेतले आहे आणि गोंदी पोलिसांच्या हवाली केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उर्वरित चार आरोपींचा आणखी शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे गोकुळसिंग कायटे ,संजय मगरे, कृष्णा तगे, सुधीर वाघमारे, कैलास चेके, देविदास भोजने, रणजीत वैराळ, विनोद गडदे, सचिन चौधरी, आदींनी हा तपास लावला.