
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली होती. आता त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होत आहे.
पहिला पराभव बाजूला सारून संघ आपला पहिला विजय साजरा करण्यासाठी आतूर झाला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीचा कणा सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरला आहे.
सूर्यालाच्या बोटाला वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत होता. या दुखापतीमुळेच त्याला आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, ‘सूर्यकुमार यादव हा विलगीकरणातून बाहेर आला आहे आणि त्याने बुधवारी मुंबई इंडियन्सचा संघ जॉईन केला आहे.
त्याने कायरन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराहबरोबर जीम सेशन देखील केला. मुंबई इंडियन्स आपल्या अधिकृत वक्तव्यात पुढे म्हणते की, ‘संघाने काल स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग सेशन केले. या सेशनमध्ये वेट ट्रेनिंग आणि फिटनेस ट्रेनिंगवर भर देण्यात आला होता.’ मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील आपला पहिला सामना हरला होता. त्यांचा दिल्लीने चार विकेट्सनी पराभव केला होता.