
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- युक्रेनवरील हल्ले सुरु झाल्यानंतर रशियावर जगभरातून विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करु नये, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंग यांनी दिला आहे. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर आयात वाढ केल्याची माहिती जाणून घेण्यास अमेरिका उत्सुक नाही. सिंग सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. रशियावर अमेरिकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमागे महत्त्वाची भूमिका दलिप सिंग यांनी बजावली आहे. ते भारतीय वंशाचे असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. युक्रेन – रशिया दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताबरोबर चर्चा करण्यासाठी दौऱ्यावर ते आले आहेत. या प्रसंगी सिंग प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्यास रशिया तुमची बाजू घेईल, अशी मूळीच अपेक्षा ठेवू नका. कारण रशिया आणि चीन हे चांगले मित्र झाले आहेत. जगाला युद्धात ढकलणाऱ्या रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचे कोणत्याही देशाकडून उल्लंघन होऊ नये, असे आम्हाला वाटते. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये काही विपरित घडलेले नाही. मात्र जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या पायाभूत तत्त्वे अबाधित राहावे यासाठी प्रामाणिक चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे सिंग म्हणाले.