
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- व्यापारी नौवहन (मर्चंट नेव्ही) क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षणाच्या संधींबाबत युवकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांना या क्षेत्राबाबत अधिक माहिती व्हावी या दृष्टीने शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय नौवहन दिवस समितीतर्फे आयोजित राज्यभर साजरा केल्या जाणाऱ्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 31) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
भारताला व्यापारी नौवहनाचा मोठा इतिहास लाभला असून सत्य नारायण कथेपासून अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये भारताच्या सागरी व्यापाराचा उल्लेख आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरी वाहतुकीचे योगदान फार मोठे असून या क्षेत्राच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान व्हावे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.