
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- महेंद्र कॉलनी प्रभागातील जयसियारामनगर, द्वारकानगर, विलासनगर,संतोषीनगर,आझादनगर या भागातील नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. तेथील पाणीपुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी माजी नगरसेवक संजय वानरे यांनी केली असून,आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.त्या भागातील ७,५०० नागरिकांची भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती चालली आहे. अमरावती शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो.मात्र,महेंद्र कॉलनी भागातील अर्ध्या ठिकाणीच पेयजल पोहोचू शकते.
या भागात मजीप्राच्या वतीने नव्या जलवाहिन्याही टाकण्यात आल्या.मात्र,अर्ध्या जलवाहिनीतही पाणी घटत नसल्याने ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही.यासाठी तेथील नागरिक माजी नगरसेवकांना संपर्क करीत आहेत.मात्र,ते ८ मार्चपासून माजी झाल्याने त्यांना मर्यादा आल्या आहेत. संजय वानरे यांनी याबाबत मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्याना मोबाइलवर संदेश केलेत. मजीप्राने अद्यापही दखल घेतलेली नसल्याची नागरिकांची तक्रारआहे.या भागातील नागरिक तीन आठवड्यांपासून त्रस्त झाले आहेत.