
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे/मुंबई :- दि. १ एप्रिल : आज वर्षा बंगल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीने भेट घेतली. गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री व शिवसेनेचे काही नेते नाराज, गृहमंत्री बदलणार, शिवसेनेकडे गृहमंत्रीपद व राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद जाणार अशा विषयांवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर या दोन मोठ्या नेत्यांमध्ये एक तास बैठक झाली. त्यामुळे महाराष्ट्रात आज फार मोठी राजकीय खळबळ उडालेली दिसली. विविध माध्यमांवरही आज दिवसभर याबाबतीत उलट सुलट चर्चा चालू होती.
बैठक संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, “गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अतिशय उत्तम रितीने काम करीत आहेत. मी त्यांच्यावर नाराज नाही. माझ्या सर्व सहकारी मंत्र्यांवर माझा विश्वास आहे.” पत्रकारांना विविध प्रश्नांवर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की,” मुख्यमंत्री माझ्या खात्याच्या कारभारावर समाधानी आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. माझी मुख्यमंत्र्यांशी खात्याच्या प्रशासकीय कामाविषयी चर्चा झाली, अन्य नाही.”