
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
– मिसळ पे चर्चा द्वारे नागरिकांशी संवाद
विद्यमान पालकमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरकरांसाठी थेट पाइपलाईनची व्यवस्था केली नाही, तर इथून पुढे निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. पण अद्याप कोल्हापूरकरांना दाखवलेले हे स्वप्न पालकमंत्र्यांना पूर्ण करता आले नाही, त्यामुळे त्या घोषणेचं काय झालं, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्री सतेज पाटील यांना विचारला. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे शहर भाजपाच्या वतीने मिसळ पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील , अजिंक्य चव्हाण, बाजीराव चव्हाण, अजित ठाणेकर, अशोक देसाई, विजयसिंह खाडे पाटील, सुदर्शन सावंत, मुरलीधर जाधव, अजित हारुगले, भारती जोशी, कविता पाटील यांच्या सह इतर मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. माननीय आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात विद्यमान पालकमंत्री राणाभीमदेवी थाटात म्हणत होते की, कोल्हापूरकरांचे थेट पाइपलाइनचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर भविष्यात निवडणूक लढणार नाही. पण कोल्हापुरकरांचे हे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्या घोषणेचं काय झालं? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षात सर्वाधिक महिला लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून कॉंग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आले नाही. असा प्रश्न विचारुन पाच वर्षांत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात कोल्हापुरात झालेल्या विकासकामांचा पाढाच यावेळी पाटील यांनी जनतेसमोर मांडला. माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, महापालिकेत अनेक वर्षांपासून सत्ता असूनही कॉंग्रेसला किमान नागरी सुविधा देखील पुरवता आल्या नाहीत. महापालिकेच्या उद्यानात स्वखर्चातून महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव मी दिला होता. पण श्रेयवादासाठी त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे अजूनही कोल्हापूरकरांना किमान नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
ते पुढे म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात माननीय दादांनी कोल्हापुरात अनेक विकासकामे उभी केली. केएसबीपीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घातली. टोलमुक्त कोल्हापूर केले. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी आणला. पण विद्यमान पालकमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी काहीही केलेले नाही.याउलट सुरु असलेले विकास प्रकल्प बंद पाडण्याचे कामच त्यांनी केले.” भाजपा उमेदवार सत्यजित कदम म्हणाले की, “ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हावी अशी आमची भूमिका होती. पण विरोधकांची विकासावर बोलण्याची मानसिकता नाही. महापालिकेच्या माध्यमातून काम करत असताना, विकासकामांची मागणी केली, त्या मान्यता देण्याऐवजी आडकाठी आणण्याचे काम करण्यात आले.”
(मुकुंद कुलकर्णी)
कार्यालय सचिव