
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट म्हणजे भाजपचा प्रोपगंडा असल्याचं मत विरोधकांकडून मांडण्यात आलं आहे. तर सत्ताधारी भाजप या चित्रपटाचं प्रमोशन जोरदारपणे करत आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी या चित्रपटावर भाष्य करुन चर्चेला तोंड फोडलं होतं. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.
या चित्रपटासंदर्भात ते म्हणाले, शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते. या माध्यमातून भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती.
देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. शरद पवार म्हणाले, मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.