
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई, दि. 1 :- राज्य कर विभागाच्या नियोजित वडाळा-मुंबई येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) भवनाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली, तसंच महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. 2 एप्रिल 2022 रोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सकाळी 9 वाजता आयोजित कार्यक्रमात होणार आहे. राज्य कर विभागातर्फे वस्तु व सेवाकर भवनाची नवीन अद्ययावत इमारत मुंबईतील वडाळा येथे उभारण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या या भूमीपूजन कार्यक्रमाला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहूल शेवाळे,आमदार कॅ.आर. तमिळ सेल्वन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रस्तावित इमारत उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनोसह सार्वजनिक वाहनाने पोहचण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी असून जीएसटी कर्मचारी व करदात्यांच्या सोयींची संपूर्ण काळजी या इमारतीत घेण्यात आली आहे.