
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- २०१९ झालेली विधानसभा निवडणूक आठवा. भाजपा-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला विशेषत: उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला.
अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत भाषणात एकदाही बोलले नाही. पंतप्रधानासमोर भाषण केले तेव्हाही काही बोलले नाहीत. अमित शाह भाषणात म्हणाले मुख्यमंत्री भाजपाचा होईल. तेव्हाही काही बोलले नाही. मात्र निकाल लागल्यानंतर आपल्यामुळे सरकार अडकतंय हे लक्षात आले. त्यावेळी अडीच वर्षाची टूम काढली असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, अमित शाहांशी एकांतात बोलला होता मग ते बाहेर का बोलला नाही. मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्राचं जनतेचे आहे. मग चार भिंतीत ही गोष्ट का केली? अमित शाह बोलतात आम्ही काही बोललो नाही. पहाटे शपथविधी झाला पाहतो तर जोडा वेगळाच होता. पळून कुणासोबत गेले लग्न कुणासोबत केले काहीच कळालं नाही. राज्यातील ३ नंबरचा पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या पक्षाला फिरवतोय. व्यासपीठांवर एकमेकांना शिव्या घालून पुन्हा सत्तेसाठी मांडीवर जाऊन बसता. तुमच्या आतील झंगाटाशी आमच्याशी काय संबंध? असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महाराष्ट्र सैनिकांचे दर्शन घेताना मला खूप आनंद होतोय. ३ वर्षापूर्वी ज्यावेळी इथं गुढीपाडवा मेळावा झाला. त्यानंतर २ वर्ष हा मेळावा घेता आला नाही. लॉकडाऊनचा काळ आठवला तर काही वेळ बरं वाटतं तर काही वेळा त्रास होतो. आज गजबजलेलं शिवतीर्थ सामसूम होतं. जगभरात शांतता होती. माणूसही दिसत नव्हता. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. त्यामुळे आजच्या सभेत थोडा फ्लॅशबॅक देऊ. २ वर्षापूर्वी झालेल्या घटना आपण विसरलो. तुम्ही विसरता तेच यांना फायद्याचं होतं. विस्मरणात जाऊन कसं चालेल असं म्हटलं.