
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोलंबो :- शेजारी राष्ट्र श्रीलंकेत हाहाकार माजला आहे. रुग्णालयातील औषधे संपल्याने डॉक्टरांनी रुग्णांचे ऑपरेशन थांबवले आहे. पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की लोकांना उपाशी झोपावे लागत आहे. पेट्रोलपेक्षाही महाग दूध विकले जात आहे.
एका कप चहाची किंमत 100 रुपये झाली आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. एक किलो बटाट्यासाठी 200 रुपये मोजावे लागताहेत. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. आता अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे.
श्रीलंकेवर अनेक देशांचे कर्ज आहे. येथे जानेवारीमध्ये परकीय चलनाचा साठा 70 टक्क्यांहून अधिक घसरून $2.36 अब्ज झाला होता, जो सातत्याने घसरत आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशातील बहुतांश जीवनावश्यक वस्तू, औषधे, पेट्रोल, डिझेल विदेशातून आयात होत नाही.