
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
चौकशी संपल्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर प्रवीण दरेकर यांनी अत्यंत गंभीर आरोप सरकारवर केला.
मुंबई :- मुंबै बॅंक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी आज चौकशीसाठी बोलावले होते. मुंबई पोलिसांनी दरेकरांची तब्बल तीन तास चौकशी केली. ही चौकशी संपल्यानंतर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर प्रवीण दरेकर यांनी अत्यंत गंभीर आरोप सरकारवर केला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, सभासद म्हणून काय लाभ घेतला? बॅंकेकडून काय लाभ घेतला? असे अनेक प्रश्न तीन तासांत विचारले गेले. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की, आम्ही सहकार्याला तयार आहोत. अनेक उलट-सुलट तेच-तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. परंतू ज्यांची नियत साफ आहे त्यांच्यावर अशा गोष्टींचा परिणाम होत नाही.
अत्यंत मुद्देसुद तपशीलवार जे-जे विचारलं त्याची उत्तरे आम्ही दिली. बरेचशे प्रश्न विचारले. खरं तर हा गुन्हा फक्त एका संस्थेपुरता आणि सभासदत्व मजूर हे बोगस असल्यापुरता सिमित असताना इतर संस्था, बॅंक, इतर अनेक विषयांसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तरी पण तपासा अंतर्गत जी माहिती आहे ती त्यांना दिली. तपासा दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त त्या ठिकाणी मॉनिटर करत होते. त्यांचा दबाव असल्याचे दिसून येत होते. जे अधिकाऱ्यांनी माहिती घेतली त्यांनी अधिकारी म्हणून जे करायला हवं ती माहिती विचारत होते. आम्हाला माहिती असलेली सर्व माहिती आम्ही दिली, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.