
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोल्हापूर :- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात राजकीय पक्षांची मोट बांधून त्याचे नेतृत्व करण्यात आपल्याला किंचितही रस नाही. जर अशी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर मात्र आपली त्यास पूर्णपणे मदत राहील; परंतु काँग्रेसला वगळून असा सक्षम पर्याय देणे अशक्य आहे, असे राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. काही राज्यांत भाजपविरोधात सक्षम पक्ष आहेत; पण देशपातळीवर ते पर्याय देऊ शकत नाहीत. ममता बॅनर्जी शक्तिशाली आहेत; पण त्या पश्चिम बंगाल पुरत्या मर्यादित आहेत.
काँग्रेस पक्ष आहे की ज्यांचे प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. म्हणूनच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्याय देताना काँग्रेसला बरोबर घेऊन तयारी करणे वास्तववादी ठरणार आहे, याचे भान ठेवले पाहिजे, असे पवार म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर यापूर्वी आम्ही कधी पाहिला नाही. दहा वर्षांपूर्वी ‘ईडी’ शब्ददेखील कोणाला माहीत नव्हता; पण आता ‘ईडी’शिवाय चालतच नाही. केवळ कारवाईच नाही, तर आधी ईडी पाठविणार अशी भीती घालायची, कोणी घाबरलाच तर त्याच्याशी सेटलमेंट करण्याच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा आहेत. केंद्र सरकारच्या कटकारस्थानाला आम्ही भीक घालत नाही, असे पवार म्हणाले.
सत्तेचा गैरवापर हा सर्वसामान्य जनतेला आवडत नाही. जनता शहाणी आहे. खोट्या आरोपावरून अनेकांना आज तुरुंगात टाकले जात आहे. शासकीय तपास यंत्रणा चुकीची वागत आहे हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्यात संताप आहे. नाराजी आहे. योग्य वेळ येताच जनताच त्याला धडा शिकविणार आहे, असेही पवार म्हणाले. यावेळी पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीचे उदाहरण दिले. राष्ट्रवादी पक्ष सतत भूमिका बदलणार पक्ष आहे या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेकडे लक्ष वेधले असता, जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं बरं होईल, अशा शब्दांत पवार यांनी पाटील यांची खिल्ली उडविली.