
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोल्हापूर :- आज सोमवारी राज्याचे गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना कोल्हापूरची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. पाटील म्हणाले, कोल्हापूर महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप हा कोल्हापूरची बदनामी करणारा आहे. ही बदनामी योग्य नसल्याने आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा सतेज पाटील यांनी वाघ यांना दिला. चित्रा वाघ यांची कोल्हापूर येथे प्रचारसभा सुरु असताना दगडफेक झाल्याची घटना घडली. त्यावर वाघ म्हणाल्या होत्या, की कोल्हापूरमध्ये महिला असुरक्षित आहेत.
पत्रकार परिषदेत गृहमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पराभव दिसत आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करुन निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न सुरु आहे. कालच्या घटनेची चौकशी करावी अशा सूचना पोलिस खात्याला दिले आहेत. तसेच प्रचाराला येणाऱ्या भाजप नेत्यांना दुप्पट सुरक्षा देण्याची विनंतीही केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दगडफेकीची घटना मॅनेज असून हा भाजपचा डाव आहे, असा आरोप पाटील यांनी केला.