
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
-देशातील रत्ने आणि आभूषण क्षेत्र यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकेल- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
-चांगल्या डिझाईन्स मुळे मूल्यवर्धन होईल आणि रत्ने आणि आभूषण क्षेत्रातील निर्यात वाढेल- नितीन गडकरी
मुंबई :- रत्ने आणि आभूषण क्षेत्राच्या वृद्धीसाठी दागिन्यांच्या रचनांच्या मुद्यावर जास्त भर देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. चांगल्या डिझाईन्स मुळे मूल्यवर्धन होईल आणि रत्ने आणि आभूषण क्षेत्रातील निर्यात वाढेल असे गडकरी म्हणाले. दागिन्यांची डिझाईन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच मी रत्ने आणि आभूषण क्षेत्राला असे आवाहन करतो की दागिन्यांच्या डिझाईनच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इटलीसारख्या देशांसोबत त्यांनी संयुक्त उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. ते आज मुंबईत इंडियन जेम अँड ज्वेलरी शो 2022(जीजेएस 2022) या भव्य प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
अखिल भारतीय रत्ने आणि आभूषण स्थानिक परिषदेने(एआयजीजे एस) मुंबईत या शो चे आयोजन केले आहे. जी जे एस 2022 हे प्रदर्शन मुंबईमध्ये तीन ते सहा एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. एमएसएमईची क्षेत्राची निर्यात, निर्यातीच्या एकूण आकारमानाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाली पाहिजे. तसेच देशाच्या एकूण जीडीपीमध्ये तिचे योगदान 40 टक्क्यांपेक्षा जास्त असले पाहिजे. यामुळे देशात अधिक प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि देशाच्या विकासाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने रत्ने आणि आभूषण उद्योग एम एस एम ई क्षेत्रांमधील एक महत्त्वाचा घटक आहे आणि यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकतो असे त्यांनी नमूद केले.
भविष्यामध्ये या क्षेत्रातील व्यापारात तीन ते चार पट वाढ होऊ शकते आणि निर्यातीच्या बाजारपेठेमध्ये या क्षेत्राला खूप मोठा वाव आहे असे गडकरी यांनी सांगितले. देशाच्या जी डी पी वृद्धीदरामध्ये एम एस एम ई क्षेत्र मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकते आणि सध्या या क्षेत्राचे एकूण निर्यातीमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त योगदान आहे आणि या क्षेत्राने सुमारे 11 कोटीपेक्षा जास्त रोजगार निर्माण केले आहेत. म्हणूनच एम एस एम ई क्षेत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारत हा दृष्टिकोन साकार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. निर्यातीमध्ये वाढ करून आणि रोजगाराला चालना देऊन आत्मनिर्भर भारत चे स्वप्न साकार करता येईल असे गडकरी यांनी अधोरेखित केले.
रत्ने आणि आभूषण उद्योगाच्या वाढीसाठी भरपूर वाव असल्याचे गडकरी यांनी सांगितले. देशात निर्माण झालेल्या रत्ने आणि आभूषण उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे सांगून मंत्री म्हणाले की, गुजरात, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये या क्षेत्रात कौशल्य विकास झाला आहे. कमी खर्चात कुशल मनुष्यबळाने देशातील हिरे उद्योगासाठी चांगले काम केले आहे असे निरीक्षण या संदर्भात त्यांनी नोंदवले. गडकरी यांनी परिषदेला नागपुरातील मिहान सेझ येथे रत्ने आणि आभूषण यांचे डिझाईन्स तयार करणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यापासून तयार उत्पादनाच्या निर्यातीपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी होऊ शकतील असे ज्वेलरी पार्क /केंद्र स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले.
कोविड नंतरच्या काळात भारतात व्यवसाय करण्यासाठी जग प्राधान्य देत आहे. “भारताची सर्वात मोठी ताकद ही आहे की जगातील सर्वात तरुण, प्रतिभावान अभियांत्रिकी शक्ती या देशात आहे” असे गडकरी म्हणाले . कोविड नंतरच्या काळात व्यापार आणि व्यवसाय नवीन ऊर्जा दाखवत आहेत, असेही ते म्हणाले. भविष्यासाठी दृष्टिकोन तयार करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले. “योग्य तंत्रज्ञानासह योग्य दृष्टीकोन” आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले की, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, पारदर्शकता, चांगली डिझाईन आणि पॅकेजिंग हे येत्या काळात व्यवसायांसाठी सर्वात मोठे भांडवल असणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ‘हँडबुक ऑन हॉलमार्किंग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय रत्ने आणि आभूषण स्थानिक परिषदेचे अध्यक्ष आशिष पेठे आणि उपाध्यक्ष संयम मेहरा, माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. रत्ने आणि आभूषण प्रदर्शन 2022 मध्ये सोने, रत्नजडित, हिरे, अतिशय उच्च दर्जाचे महागडे दागिने, रत्न, मोती, सुटे हिरे, अलाईड आणि मशिनरी या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट उत्पादक/घाऊक विक्रेते तसेच संपूर्ण उद्योगातील डीलर्सचा समावेश आहे. या प्रदर्शनात भारतभरातून मोठ्या संख्येने प्रदर्शकांचा सहभाग आहे.
अखिल भारतीय रत्ने आणि आभूषण देशांतर्गत परिषद लाखो व्यापार घटकांचे प्रतिनिधित्व करते ज्यात उत्पादक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, वितरक, प्रयोगशाळा, रत्नपारखी, डिझाइनर आणि देशांतर्गत रत्न आणि दागिने उद्योगाशी संबंधित सेवा आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन काल केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते झाले.